विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपने महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करून संधी दिली तर, आतापर्यंत पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रा. अनिल सोले यांना थांबवून विश्राम दिला.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर उत्तर प्रदेशमधील नऊ व राज्यातील चार जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील नेत्यांशी ऑनलाइन चर्चा करून हा निर्णय घेतला.
पदवीधरच्या उमेदवारीसाठी भाजपकडून प्रा. सोले आणि जोशी यांच्यात स्पर्धा रंगली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर आतापर्यंत प्रतिनिधित्व करणारे प्रा. अनिल सोले यांचा विश्वास उंचावला होता. त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांच्या संपर्कात होते. दुसरीकडे संदीप जोशी यांच्या उमेदवारीबद्दल समर्थकांना खात्री होती. त्यांनी सहा वर्षांपूर्वीच या जागेवर दावा केला होता. यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी दोन महिन्यांपूर्वी वाढदिवशी जाहीर करून मतदारसंघातील दावा अधोरेखित केला. अखेरच्या टप्प्यात सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय भेंडे यांनीही दावा केला होता. सोमवारी जोशी यांच्या पारड्यात उमेदवारी आली.
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी जोशींची ओळख आहे. गेल्या ३-४ वर्षांत त्यांनी नागपूर महोत्सव, नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवासाठी पुढाकार घेतला. भाजपचा ‘गड’ असणाऱ्या या मतदारसंघाचे आव्हान काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी स्वीकारले आहे.
‘गड राखणार’
‘पक्षाचा गड असलेल्या पदवीधर मतदारसंघात भाजपने मला संधी दिली आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन गड कायम राखण्याचा प्रयत्न करेन. पक्षाने आतापर्यंत दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांसह विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. दोन दशकांपासून शहरवासीयांना माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची पारख केली. यापुढेही असेच प्रयत्न राहतील’, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी व्यक्त केली.