नवी मुंबई : राजेंद्र पाटील : राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या 190 अधिकार्यांच्या बदल्या 15 ऑगस्टपर्यंत होण्याचे संकेत पोलीस महासंचालक यांनी रविवारी दुपारी पोलीस महासंचालक फॅन या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधताना दिले.
रविवारी दुपारी 2 ते 4 यावेळेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सुमारे 1500 हून अधिक राज्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर, राज्य राखीव दल, एमएसएफ, नियंत्रण कक्ष, मोटार वाहन, फोर्सवन,वायरलेस विभागातील कर्मचार्यांनी सहभाग नोंदवला.
गडचिरोली ते मुंबई पर्यंत पोलीस सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकार्यांनी गृहकर्ज (डीजी लोन), पदोन्नती, रजा, दहा मिनिटे बाहेर गेल्याने पूर्ण दिवसाचा पगार कपात, सिलेंडर रजा, गणेवश भत्ता, पोलीस भरती, आंतरजिल्हा बदली, महिला कर्मचार्यांना देण्यात येणारी गार्ड ड्युुटी, घरांचे प्रश्न, एसआरपीएफ जवानांना 24 तास नोकरीनंतर विश्रांती असे अनेक प्रश्न कर्मचार्यांनी पोलीस महासंचालकांसमोर उपस्थित केले.
यावेळी पोलीस अधिकार्यांनी राज्यातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबत विचारणा केली. तर पोलीस हवालदार दर्जाच्या अधिकार्यांनी खातेतंर्गत पोलीस उपनिरीक्षक यांच्या परीक्षा रद्द करु नये अशी विनंती केली. मात्र त्यावर पोलीस महासंचालक यांनी 2013 साली झालेल्या परिक्षेबाबत सविस्तर उत्तर दिले.
कुठलीही परीक्षा ही एक वर्षापेक्षा अधिक काळ ग्राह्य धरली जात नाही, असे स्पष्ट केले. अजून तीनवेळा कर्मचारी ही परीक्षा देऊ शकतील असे ही त्यांनी सांगितले. नव्याने भरती होणार्या कर्मचार्यांना ही परीक्षा देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
अधिकार्यांच्या बदल्या येत्या चार दिवसांत होतील, असे एका प्रश्नाला उत्तर देताना पोलीस महासंचालक पांडे यांनी सांगितले. ज्यांना जे ठिकाण पाहिजे, अर्जात जे ठिकाण नमूद केले आहे त्यापैकीच एका ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत आणि आताही तशाच बदल्या होतील. कुणाला काही अडचण आल्यास आम्ही आहोत इथे असे उत्तर पांडे यांनी दिले.
यावेळी अनेक कर्मचार्यांनी केलेल्या तक्रारींचीही दखल पोलीस महासंचालकांनी घेतली. काही असल्यास थेट माझ्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. असेही कर्मचारी आणि अधिकार्यांना सांगितले.