‘मातृ वंदना’ ठरतेय महिलांसाठी वरदान

नागपूर : गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. तसेच मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी १ जानेवारी २०१७ रोजीपासून राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही प्रथमत: गर्भवती असलेल्या महिलांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २७ हजार ६२७ हजारावर गर्भवती महिला व स्तनदा मातांनी याचा लाभ घेतला असून, या योजनेला जिल्ह्यात प्रतिसादही मिळत आहे.

ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला बाळातपणानंतर आपल्या कामावर गेल्याने त्यांच्या बाळाला आईचे दूध मिळत नाही. बाळाचेही पोषण होत नाही आणि यातून कुपोषणाची समस्या जन्म घेते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ केली. ही योजना ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’मार्फत राबविली जाते. योजनेच्या लाभाची पाच हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यात थेट जमा करण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी जातीची व उत्पन्नाची अट नसून, शासकीय सेवेत नसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आर्थिक साहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळतो. दुसरा हप्ता बाळंतपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या ११० दिवसानंतर. तर योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता हा ती स्त्री प्रसूत झाल्यानंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो. नोंदणी करतांनाच गर्भवती महिलांना आपल्यासह पतीचे आधारकार्ड, स्वत:चे बँक खाते व तपासणी नोंदणी दाखला हे सादर करणे आवश्यक असते. पहिल्या व दुसऱ्या लाभासाठी आधार कार्ड अत्यावश्यक नाही. परंतु, तिसऱ्या लाभाकरिता आधार कार्ड महत्त्वाचे आहे.

बँकेशी आधार अपडेट नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत असतात. हे विशेष. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये या योजनेची ऑक्टोबर २०१७ पासून अंमलबजावनी सुरू झाली. तर शहरी भागात ऑक्टोबर २०१८ मध्ये अंमलबजावनी सुरू झाली. आजवर या योजनेसाठी जिल्ह्यात एकुण २७ हजार ६२७ गर्भवती मातांनी नोंदणी केली असून, यापैकी २६ हजार ९८४ महिलांनी आजवर या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील लाभ घेतला आहे. २५ हजार २५८ गर्भवती मातांना योजनेचा दुसरा तर १६ हजार ७०५ महिलांना तिसरा हप्त्याचे अनुदान वाटप केल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवाल सांगतो.

अधिक वाचा : मई के तीसरे सप्ताह में जारी हो सकता है सीबीएसई 10वीं और 12वीं का रिजल्ट