नागपूर : गेल्या वर्षी दुष्काळानं होरपळलेल्या भारतातील शेतकऱ्यांना यंदा मान्सूनदिलासा मिळणार नाही. यावर्षी मान्सून ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता आहे.
केरळात ४ जून रोजी मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला होता. देशातील चारही प्रदेशांमध्ये तो सरासरीपेक्षा कमीच असेल, असंही संस्थेनं सांगितलं होतं. त्यानंतर आज भारतीय हवामान खात्यानंही मान्सून अंदाज व्यक्त केला आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर ६ जून रोजी मान्सून धडकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. मात्र, यंदा केरळमध्येच उशिरानं आगमन होणार असल्यानं महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या मोसमात महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याला मोठा फटका बसला. आगामी मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या या भागातील शेतकऱ्यांना यंदाही मान्सून हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मध्य भारतात समावेश होणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमध्ये यंदा सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
अधिक वाचा : पत्नीची हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न