नागपूर : सीपी अॅण्ड बेरारच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न-मेट्रो आणि सिमेंट रस्ते ही नागपूरच्या विकासाची ओळख झाली आहे. या सुविधा नागपूरमध्ये निर्माण होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचवेळी मिहानमध्ये आवश्यक त्या प्रमाणात उद्योग आलेले नाहीत. मेट्रोपेक्षाही तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टीने मिहान आणि नागपुरात उद्योग येणे अधिक आवश्यक आहे, अशा भावना महालातील सीपी अॅण्ड बेरार कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नवमतदारांनी त्यांच्या अपेक्षा, सरकारची कामगिरी, तरुणांना भेडसावणारे मुद्दे अशा विविध विषयांवर मतप्रदर्शन केले.
या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी रोजगारनिर्मितीच्या आवश्यकतेचा मुद्दा वारंवार मांडला. निवडून येणाऱ्या सरकारने मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात आणि बेरोजगारी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बेरोजगारीचे प्रमाण २०१४ नंतर वाढले आहे. खासगीकरणाचे वाढते प्रमाण हे या बेरोजगारीला कारणीभूत आहे. शासकीय नोकऱ्यांचे आणि उपलब्ध जागांचे प्रमाण सातत्याने कमी होते आहे. स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मात्र, या सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही काही उपयोग होत नाही. या तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि गेल्या पाच वर्षांत तो वाढला आहे, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर विद्यार्थ्यांनी मते मांडली. शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत द्यायला पाहिजे. शेतमालाच्या हमीभावासाठी सातत्याने आंदोलने केली जातात. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. या समस्या सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी हमीभावासह इतर उपाययोजना गांभीर्याने करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाल्यास त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे विश्लेषण चर्चेतून पुढे आले.
उमेदवारांना हवे सर्व प्रकारचे ज्ञान!
केवळ चेहऱ्यांच्या आधारे नव्हे, तर मुद्द्यांच्या आधारे मतदान करणार असल्याचे या कॉलेजमधील तरुणाईने सांगितले. चर्चेत सहभागी झालेल्यांपैकी बहुतांश तरुण हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यांनी निवडणुकीतील उमेदवारांबद्दल असलेल्या अपेक्षा बोलून दाखविल्या. जो कुणी उमेदवार निवडणुकीत उभा असेल त्याला आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व समस्यांची जाण असावी. या गोष्टींवर त्यांचा अभ्यास असेल तर आमचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत आणि विविध ठिकाणी आमचे प्रश्न मांडू शकतील, असे विद्यार्थी म्हणतात.
लष्करी कारवाईचे आकर्षण
केंद्र सरकारने मागील पाच वर्षांत राबविलेले लष्करी धोरण तरुणांना आकर्षित करणारे ठरले आहे. उरी हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हल्ल्यानंतरचा पाकव्याप्त काश्मिरमधील हल्ला या सरकारच्या कारवाईचे चर्चेदरम्यान अनेकांनी समर्थन केले. या प्रत्युत्तरांमुळे भारताची ‘सशक्त राष्ट्र’ म्हणून प्रतिमा तयार झाली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
निरीक्षणे नवमतदारांची
– नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न दाखविण्यात आले होते. मात्र, या निर्णयाचा फटका सामान्य नागरिकांनादेखील बसला आहे.
– जीएसटीसारखा निर्णय हा करचोरीला आळा घालणारा निर्णय होता. ‘एक देश, एक कर’ हे उत्तम धोरण आहे.
– गरिबांच्या मुलांनादेखील चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि शिक्षणामधील तफावत दूर व्हावी.
– पैसे देऊन नोकऱ्या लाटण्याचे प्रकार बंद व्हावेत आणि ज्यांच्याकडे खरोखर कौशल्य आहे, अशांना लाभ व्हावा.
– आरबीआय गव्हर्नर, न्यायपालिकेतील व्यक्तींची सरकारविरोधातील नाराजी, उद्योगपतींकडे असलेला कल हे चिंतेचे मुद्दे आहेत.
– पैसे घेऊन, जात-धर्माच्या आधारे मतदान होते. मतदारांनीदेखील आपल्या वर्तनात सुधारणा केली पाहिजे.
अपेक्षा तरुणांच्या
अतिखासगीकरण टाळावे.
– निवडणुकीच्या वर्षात नव्हे, दरवर्षी कराव्यात नोकऱ्या तयार
– डिजिटल सुविधांबद्दल मोठ्या प्रमाणात जागरुकता गरजेची, मार्गदर्शन शिबिरे घ्यावी.
– तेच तेच विषय नको, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवावा.
अधिक वाचा : “BJP 1-Man Show, 2-Man Army”: Shatrughan Sinha Joins Congress