नागपूर : शहर भाजप महिला आघाडीच्या दोनदा अध्यक्ष, दोनदा नगरसेविका आणि आता शहराच्या पहिल्या नागरिक असलेल्या महापौर नंदा जिचकार यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. ‘पक्षाने शहरात महिलांनाही उमेदवारी द्यावी’, असे बोलून दाखवित पश्चिममधून लढण्याची इच्छा असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ‘महापौरपदाला मुदतवाढ द्यावी’, असे पत्र दीड महिन्यापूर्वीच त्यांनी राज्य सरकारकडे पाठविले आहे. आता त्यांनी मनातील इच्छा बोलून दाखविल्याने पश्चिम नागपुरातील इच्छुक सतर्क झाले आहेत.
महापौर नंदा जिचकार या भाजपकडून झालेल्या सहाव्या महिला महापौर आहेत. यापूर्वी पक्षाकडून वसुंधरा मसूरकर, डॉ. कल्पना पांडे, पुष्पा घोडे, माया इवनाते, अर्चना डेहनकर यांना महापौरपदाचा सन्मान मिळाला. आज शहरातून विधिमंडळात गेलेल्या सहापैकी पाच आमदार नगरसेवक होते. शिवाय, विधान परिषदेतही आमदार असलेले आधी नगरसेवक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार प्रा. अनिल सोले या दोघांनी नागपूरचे महापौरपद भूषविले. परंतु, महिला महापौरांना आमदार बनण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे बहुधा महापौर जिचकार यांना आमदारपदाचे वेध लागले असावेत, असे बोलले जात आहे.
महापौर जिचकार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात राहतात. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त कुणालाही संधी नाही. शेजारच्या पश्चिम नागपूरमध्ये भाजपतर्फे उमेदवार बदलण्याची चर्चा आहे. विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर घूमजाव करीत उमेदवारी घेतली व पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी तशी त्यांनी कुठलीही इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यामुळे देशमुख हे पक्षातर्फे उमेदवारीचे दावेदार असले तरी, बदल करण्याचा पक्षात विचार झाल्यास उमेदवारी मिळू शकते, यासाठी अनेकजण प्रयत्नरत आहेत.
जिचकार या महापौर असल्याने संपूर्ण शहरभर त्यांचा वावर असतो. शहरातील अनेक भागांत त्या फिरत असतात. पश्चिम नागपुरातील अनेक भागांत त्यांनी दौरा करून नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. याशिवाय, महापौर इनोव्हेशन अवार्ड व इतर चांगले उपक्रम राबविल्याचेही त्यांच्याकडून अनेकदा सांगण्यात येते. अनेक उपक्रम राबवायचे असल्याने महापौरपदाला मुदतवाढ मिळावी, अशीही त्यांची इच्छा आहे. याच धर्तीवर पक्षाने शहरात किमान एका मतदारसंघात महिलेला उमेदवारी द्यावी, असे त्यांना वाटते. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी ‘पक्षातर्फे महिलेलाही उमेदवारी मिळावी’, असे बोलून दाखविले. पश्चिममधून आपला दावा आहे का, यावर त्यांनी ‘आमचे नेते देशमुख आहेत’, असे सांगत वेळ मारून नेली.
अधिक वाचा : हरिहर हाऊसिंग एजन्सीला हायकोर्टाचा दिलासा