मुंबई : राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेश मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. दरम्यान, गणेशमूर्तीच्या उंचीबाबत राज्य सरकारने मर्यादा घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे.
गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना ४ फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जात आहे. त्यामुळे गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
♦गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
♦ कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
♦ सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
♦ सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी
♦ विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
♦ नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी.
♦ शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
♦आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
♦ नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
♦ गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.