दिलासादायक! कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी, ICMR प्रमुखांची माहिती

corona vaccine

नवी दिल्ली :  देशांतर्गत बनवण्यात येणा-या कोव्हॅक्सिन तसेच कोव्हिशील्ड या दोन्ही लसी कोरोना संसर्गासंबंधी चिंता वाढवणा-या डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याची दिलासादायक माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. या दोन्ही लसी कोरोना संसर्गाच्या अल्फा, बीटा, गामा तसेच डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटवर प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जात आहे. या चाचण्यांचे अहवाल येत्या ७ ते १० दिवसांमध्ये येतील,असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. देशात डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. तुर्त या व्हेरियंटने ग्रस्त रूग्णांची संख्या कमी असली तरी संख्या दररोज वाढत आहे.

जगभरातून समोर येत असलेल्या माहितीनूसार विविध लसींची कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरियंटला निष्प्रभावी करण्याची क्षमता घटत चालली आहे. पंरतु, कोव्हॅक्सिन डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी आहे.या व्हेरियंटमध्ये संसर्गाविरोधात लढताना प्रतिपिंडाची निर्मीती थोड्या प्रमाणात होत असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. कोव्हीशील्ड लस घेसणा-यांमध्ये देखील या व्हेरियंट विरोधात प्रतीपिंड तयार होत असल्याचे दिसून आले आहे. सोबत या लसी अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरियंटला निष्क्रिय करण्यात यशस्वी ठरत असल्याचे भार्गव म्हणाले.

कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरियंट आतापर्यंत जगातील १२ देशांमध्ये आढळला आहे. देशात १२ राज्यांमध्ये या व्हेरियंटनेग्रस्त ५१ रूग्ण आढळले आहेत. पंरतु, या व्हेरियंटने संसर्ग वेगाने पसरत असल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंट आढळला होता. महाराष्ट्रात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६०% रूग्ण या व्हेरियंटने ग्रस्त असल्याचे फेब्रुवारीत दिसून आले होते. हा व्हेरियंट जगातील ८५ देशांमध्ये आतापर्यंत आढळला आहे.