मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी आज पुन्हा नाट्यमय वळण घेतलं. राष्ट्रवादीतून फुटून भाजपशी हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारांनी सोडलेली साथ आणि पवार कुटुंबीयांच्या मनधरणीनंतर अजितदादांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारला विरोध असलेल्या अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी केली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्याचं पत्र गटनेते या नात्यानं दाखवून त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्या आधारे राज्यपालांनी भाजप-राष्ट्रवादी (अजितदादा गट)चा सत्तास्थापनेचा दावा करून त्यांचा शपथविधीही घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले होते. मात्र, अजित पवारांच्या निर्णयाशी संबंध नसल्याचं राष्ट्रवादीनं जाहीर केलं. तसंच, अजित पवारांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती.
अजितदादांनी शरद पवारांना हा धक्का दिल्याचं मानलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात उलटं घडलं आहे. काकांविरुद्धच्या संघर्षात अजित पवारांना पुन्हा पाऊल मागं घ्यावं लागलं आहे. अजितदादांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच नव्या सरकारला चौफेर घेरण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आखली होती. नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही, हे पहिल्याच दिवशी शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले एकेक आमदार हळूहळून राष्ट्रवादीच्या गोटात परतले होते. केवळ एक आमदार अजितदादांसोबत होता. दुसरीकडं, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांना मजबुतीनं पक्षासोबत राखलं होतं. त्यामुळं फडणवीस यांचं सरकार तरणं जवळपास अशक्य होतं. याची जाणीव अजितदादांना झाली होती.
दुसरीकडं, पवार कुटुंबीय व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अजितदादांची मनधरणी सुरू होती. खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांना भावनिक आवाहन केले होते. सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे यांनी आज अजित पवारांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. त्यामुळं त्यांच्यावर दबाव वाढला होता. त्यातूनच त्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे.