आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू लॉकडाऊन इशारा देतोय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र लॉकडाऊन

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

येत्या काही दिवसात मी तज्ज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण लसीने कोरोना होत नाही असं नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे पुण्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात 7 दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर दिवसा जमावबंदी लावण्यात आली आहे.

लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय तो पर्याय सांगा
कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल. रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू
पहिला जीव वाचवायचा आहे, आज इशारा देतोय, पूर्ण लॉकडाऊनचा, दोन दिवसात दृश्य परिणाम दिसला नाही, किंवा दुसरा पर्याय मिळाला नाही, तर जगामध्ये जे सुरु आहे, पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन होतोय.. त्यामुळे आता ठरवायला हवं, ही लाट मी रोखेनच पण पुढची लाट येऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.