मुंबई: शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि वरळी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी बूथवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. वरळी मतदारसंघातील उमेदवार असलो तरी, माझा जीव संपूर्ण महाराष्ट्रात अडकलाय, असंही ते म्हणाले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळीच मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक बूथला भेट देऊन पाहणी केली. ‘आज महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस आहे. पुढील पाच वर्षे महाराष्ट्राची, तुमचं मत ठरवणार. तुम्ही नक्की मतदान करा,’ असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांनी कुटुंबासहित मतदान करून फोटो ट्विट केला आहे. आम्ही मतदान केलं आहे. तुम्ही केलं का? असा प्रश्न विचारून घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं ते म्हणाले. आपला सर्वात मोठा आवाज आहे. हा क्षण आपल्या राज्याचं भवितव्य ठरवेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, वरळी मतदारसंघातील बूथला भेट देत असताना त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदाज निवडणूक लढवत आहेत. स्वतःसाठी मतदारसंघात फिरताना काय भावना आहेत, असा प्रश्न विचारला असता, खूप वेगळं वाटत आहे. याआधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठिकठिकाणी फिरलो आहे. आज मी मतदानानंतरचे आकडे किंवा कोणताही निवडणूक अंदाज व्यक्त करणार नाही. हा दिवस मतदारांचा आहे. मत कुणालाही द्या. योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा. पण आपला अधिकार नक्की बजावा, असं ते म्हणाले. मी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलो तरी, माझा जीव संपूर्ण महाराष्ट्रात अडकला आहे, असं आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
वरळी मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
२०१४ विधानसभा निवडणूक
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता.