नागपूर: वर्धा मार्गावर मेट्रो सेवा सुरू असून, लवकरच हिंगणा मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोची यंत्रणा कामाला लागली आहे. अवघ्या १४ महिन्यांच्या कालावधीत या रिचमधील ११ किलोमीटर ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले. ओएचई केबलचे कार्य अंतिम टप्प्यात असून, लवकरच या ठिकाणी विद्युतलाइन चार्ज केली जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी ओएचई विद्युत केबल महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पामध्ये १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रूळ वापरण्यात आले आहे. १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रूळ अत्याधुनिक पद्धतीने बनविल्या जाते, ज्यामध्ये रुळाच्या वरील भागावर बळकट बनविण्याकरिता विशेष लक्ष दिले जाते. यामुळे रुळाचे आयुष्य वाढते.
आरडीएसओने मेट्रोच्या कामासाठी ६० किलो १०८० एचएच रूळचा वापर करणे अनिवार्य केले आहे. भारतातील सर्व मेट्रोमध्ये याचा वापर करण्यात आला आहे. रुळाचे हेड हे हार्ड म्हणजेच कडक असते, जे रेल्वेच्या चाकांना आधार देते व स्थिरता प्रदान करते. एक किलोमीटरचा ट्रॅक निर्माण करण्याकरिता १२० टनच्या रेलची आवश्यकता असते. इतर मेट्रोमध्ये रुळाची लांबी १८ मी आहे. मात्र, नागपूर मेट्रोसाठी वापरण्यात आलेले रूळ २५ मी. लांबीचे आहेत. नागपूर मेट्रोने रशियावरून या रूळाची आयात केली आहे.
…अशा झाल्या चाचण्या
रूळ एवराज कंपनीच्या वेस्ट साईबिरीयन मेटलर्जीकल कारखान्यामध्ये तयार केल्या गेले. या रुळाचे उत्पादन झाल्यावर रुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी ध्वनिलहरी चाचणी, प्रोफाइल मापन, विद्युत तपासणी, अल्ट्रासॉनिक चाचणी, बार कोडिंग इत्यादी प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहे. नागपूर मेट्रोने रूळाच्या चाचणी आणि निरीक्षणाकरिता जगातील सर्वोत्कृष्ट चाचणी आणि ऑडिटिंग एजन्सी ‘मेसर्स एसजीएस वोस्तोंक’ला नियुक्त केले आहे.
अधिक वाचा : एक लाखाच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण