भररस्त्यात मारामारी, पोलिसानं महिलेच्या कानशिलात लगावली, महिलेनंही श्रीमुखात भडकावली

भररस्त्यात मारामारी, पोलिसानं महिलेच्या कानशिलात लगावली, महिलेनंही श्रीमुखात भडकावली

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. मे महिन्याच्या तुलनेत देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. मात्र अजूनही देशात दररोज २ लाखांहून अधिक करोनो रुग्ण आढळून येत असल्यानं धोका कायम आहे. मात्र तरीही अनेक जण कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळताना दिसत नाही. मध्य प्रदेशच्या सागरमध्ये लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या मायलेकींना रोखलं. यानंतर त्या दोघींनी पोलिसांसोबत वाद घातला. प्रकरण अगदी मारहाणीपर्यंत गेलं.

मास्कशिवाय फिरणाऱ्या मायलेकीकडे पोलिसांनी मास्कबद्दल विचारणा केली. मायलेकींनी महिला पोलिसाला धक्काबुक्की केली. महिला पोलिसानं धक्का देणाऱ्या महिलेच्या कानशिलात लगावली. त्यानंतर महिलेनंदेखील पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली. यामुळे संतापलेल्या महिला पोलिसानं पुन्हा त्या महिलेच्या थोबाडीत दिली. पोलिसानं महिलेचे केस पकडून तिला खेचत नेलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हाणामारी थांबवली. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. यानंतर पोलिसांनी मायलेकींविरोधात गुन्हे दाखल करत त्यांची रवानगी तुरुंगात केली.

सागर जिल्ह्यात असलेल्या रहली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. माय लेकी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत होत्या. त्यांना दोन पोलिसांनी रोखलं. मास्क न घालण्यामागचं कारण विचारत पोलिसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितलं. त्यामुळे माय लेकी पोलिसांशी गैरवर्तन करू लागल्या. बघता बघता प्रकरण मारामारीपर्यंत आलं. या प्रकरणी पोलिसांनी मायलेकीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.