प्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट

मुंबई : करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून अनेक फॅन्सना तो प्रचंड आवडला तर काहींनी त्याच्यावर टीका केली.या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे असे आरोपही करण्यात आले. परंतु, चित्रपटात अशी कोणतीही गोष्ट दाखवली गेली नसल्याचा खुलासा करत अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच आपले विचार मोकळेपणानं मांडताना दिसते. आगामी ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिनं प्रेम , लव जिहाद सारख्या अनेक विषयांवरील प्रश्नांना मोकळेपणानं उत्तर दिली. लव जिहादविषयी बोलताना आलिया म्हणाली की ‘प्रेम केवळ प्रेम असतं. त्याला कोणत्याही धर्माचे बंधन नसते आणि मुळात प्रेमाला कोणतेच बंधन नसावे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन जीवांमध्ये धर्माचा अडसर कधी येऊ नये. दोन लोकांना जेव्हा लग्न करायचं असेल, आयुष्यभर एकत्र राहायचं असेल किंवा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं असेल तर धर्माबाबत त्यांनी विचार करू नये. ‘ असं ती म्हणाली.

मी मांडलेले विचार काही जणांना पटणार नाहीत असंही तिनं नमूद केलं. ‘माझे विचार ऐकून अनेकांना ते पटणार नाहीत अशी मला शंका आहे. पण मला वाटते की एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांना वेगळं करण्यासाठी धर्माचा वापर करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांना ज्यावेळी वेगळं व्हावं वाटेल तेव्हा ते स्वत:च्या मर्जीनं वेगळे होतील. पण केवळ त्यापैकी एक हिंदू आणि दुसरा मुसलमान आहे म्हणून दोघांना वेगळं करणं अत्यंत चुकीचं आहे. प्रेम ठरवून केलं जाऊ शकत नाही.’ असंही ती म्हणाली.

‘कलंक’ची नेमकी कथा काय हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी चित्रपटाची कथा १९४५ मध्ये घडते. शिवाय, भारत-पाक फाळणीच्या दाहक अनुभवावर हा चित्रपट आधारलेला आहे अशी चर्चा आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा : नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत लवकरच काँग्रेस मोठा गौप्यस्फोट करणार- राहुल गांधी