सांगली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना करत आहेत. मात्र, तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले.
ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजूनही खबरदारी घेण्याची गरज असल्याचे म्हटले. कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनापासून बचावासाठी व्यवस्था अधिक उत्तम करण्यात येईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही आपल्याला तोंड देता आले पाहिजे. दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे कोरोनाची लाट परतवून लावण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देणे, हेच राज्य सरकारचे धोरण
राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन देणे, हेच सरकारचे धोरण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अनेक केंद्रांवर लसी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. मात्र, एका डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर दोषी आहेत, असे मानण्यात अर्थ नाही. दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची नवी लाट येणार?
देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल.