चिंताजनक! विदर्भात रुग्णसंख्या लाखाच्या दिशेने तर मृत्यू दहा हजाराकडे

Date:

नागपूर : विदर्भात वाढत्या कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. रविवारी, ४२७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी भर आहे. या रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या ९४, ७९३ झाली आहे. विशेष म्हणजे, दहाही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली. ८२ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ६११५ पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यातही विक्रमी रुग्णांची नोंद झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५२,४७१ वर गेली आहे. ४५ रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांची संख्या १६५८ झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातही रुग्णसंख्येने उच्चांक गाठला ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८७७४ झाली असून दोन रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या १९८ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात नऊ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली. मृतांची संख्या ६० झाली आहे. १८० रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या २८७८ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २९० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ५८५८ तर मृतांची संख्या ७१ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात २५८ रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ५७०९ झाली असून मृतांची संख्या १५५वर पोहचली आहे.

अकोला जिल्ह्यातही सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. २३३ रुग्णांचे निदान झाल्याने येथील रुग्णसंख्या ५६२० झाली आहे. चार रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १८१ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात ११४ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या २८०४ तर मृतांची संख्या ५४ झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात १७७ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या ४९५१ वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १३३ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. बाधितांची संख्या २५७० झाली आहे. जिल्ह्यात तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४७ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ८० रुग्णांचे निदान तर चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३१५८ तर मृतांची संख्या ४९ झाली आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related