नागपुरात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही; जलज शर्मा यांची ग्वाही

ऑक्सिजन

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी आहे. नागपुरात सध्या खासगी रुग्णालयात १३७७ बेडस आणि शासकीय रुग्णालयात १४५० बेडस उपलब्ध आहेत. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी ४२०० जम्बो सिलेंडरची मागणी होत आहे तर शहरात ४५०० जम्बो सिलेंडरचे उत्पादन होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.

नागपुरात सध्या ३ शासकीय, २ धर्मादाय आणि ३३ खासगी रुग्णालय कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. यात लवकरच नवीन कोविड रुग्णालयांची भर पडणार आहे. भविष्याची गरज लक्षात घेता ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपुरात कोविड टेस्टिंगच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर दररोज २००० ते २५०० टेस्टिंग होत होती. आता मनपा व खासगी रुग्णालयांच्या माध्यमाने ६ हजार लोकांची टेस्टिंग होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

अंतिम टप्प्यातील उपचारामुळे मृत्यू
आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात दररोज आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची टीम डेथ अनॅलिसिस करीत आहे. तीन ते चार तास होणाऱ्या या आढावा बैठकीत शहरातील मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वेळीच चाचणी करा
कोरोनाची लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा कोविड चाचणी करून वेळेवर उपचार घेतल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मनपाच्या नजीकच्या केंद्रात चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जलज शर्मा यांनी केले.