नागपूर : एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे. आज ५३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. मृतांची संख्या १५६९ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १६०९, ग्रामीणमधील ४४७ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यासोबतच आता सप्टेंबर महिन्यातही रुग्ण व मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. परंतु समाधानकारक बाब म्हणजे, बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ३१ ऑगस्ट रोजी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५.११ टक्क्यांवर होते, आता ते ७३.६१ टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत ३५,७३८ रुग्ण बरे झाले आहेत. यात होम आयसोलेशनमधील १९७२४ रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८,८८८ तर ग्रामीणमधील ६८५० रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत शासकीयसह, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये ११२४३ रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये ५८६९ रुग्ण आहेत. ९०५८ चाचण्यांमधून
६९९८ रुग्ण निगेटिव्ह
आज अॅन्टिजन व आरटीपीसीआर असे एकूण ९०५८ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६९९८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, ५१३१ रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ७६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ४३७० रुग्ण निगेटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये १७७१ रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात ७४५ रुग्ण पॉझिटिव्ह तर १०२६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एम्स प्रयोगशाळेमधून १७, मेडिकलमधून १८२, मेयोमधून १९८, माफसूमधून १२०, नीरीमधून ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोविडने घेतला डॉ. संजय पुरी यांचा जीव
रामनगर येथील रहिवासी, वरिष्ठ कन्सल्टंट फिजिशियन डॉ. संजय पुरी (६६) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सात महिन्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित डॉक्टरचा हा पहिलाच मृत्यू आहे. डॉ. पुरी यांची उत्कृष्ट शिक्षक व फिजिशियन म्हणून ओळख होती. गेल्या २५वर्षांपासून रविनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा देत होते. डॉ. पुरी यांनी एमबीबीएस व एमडीचे शिक्षण मेडिकलमधून पूर्ण के ले होते. काही वर्षे त्यांनी मेडिकलमध्ये लेक्चरर्स म्हणून विद्यार्थ्यांना शिकविले. त्यानंतर कामगार विमा रुग्णालयात त्यांनी सेवा दिली. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. २२ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली २३ ऑगस्टपासून त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. पुरी हे गेल्या ३५ वर्र्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत होते.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ८८७४
बाधित रुग्ण : ४८,५५०
बरे झालेले : ३५,७३८
उपचार घेत असलेले रुग्ण : ११२४३
मृत्यू :१५६९