नागपूर : तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.
यादवनगरात हा पेट्रोलपंप आहे. दिवसभराच्या पेट्रोल विक्रीची रक्कम मोजल्यानंतर स्रेहा अजय साखरे ही महिला कर्मचारी पंपाच्या कॅबिनमध्ये रक्कम जमा करायला जात असताना अचानक तीन लुटारू पेट्रोल पंपावर आले. त्यातील एकाने साखरे यांना तलवार लावून त्यांच्याजवळचे १६ हजार, ४२० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर शिवीगाळ करीत आरोपी त्यांच्या होंडा अॅक्टिव्हावर बसून सुसाट वेगाने पळून गेले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पंपावरील कर्मचारी गोंधळले. त्यांनी आरडाओरड केली. नंतर यशोधरानगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंपावरच्या सीसीटीव्हीमधून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, स्रेहा साखरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
बाबा लंगड्याची टोळी जेरबंद
यशोधरानगर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शोधमोहीम राबविली.
मोहम्मद जिशान उर्फ बाबा लंगड्या मोहम्मद खलील शेख (वय २१), आरिफ अली लियाकत अली (वय २७)आणि सूर्या बाबूराव जांभूळकर (वय १९) या तिघांनी हा गुन्हा केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना वनदेवीनगरातील रेल्वेपुलाखाली पकडले.
दारूत उडवली रक्कम
आरोपींनी पेट्रोल पंप लुटल्यानंतर ओली पार्टी केली. दारू आणि जेवणात आठ हजार रुपये उडवले. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ८,०४० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमाकांत दुर्गे, सहायक निरीक्षक श्रीनिवास दराडे, प्रकाश काळे, विनोद सोलव, नायक मधुकर निखाडे, विजय लांजेवार, आफताब शेख, रत्नाकर सोनटक्के यांनी ही कामगिरी बजावली.