नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १,४५०, ग्रामीणमधील ४७८ तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्ण आहेत. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर ७१ टक्क्यांवर गेल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. नागपूर जिल्हात मागील काही दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या १७०० ते २००० च्या घरात जात आहे. यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण रुग्णसंख्या एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, रोज ४० ते ५० मृत्यूची नोंद होत असल्याने एकूण मृत्यूची संख्या तीन हजारावर जाण्याचीही शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत शासकीय व खासगी रुग्णालयांची व्यवस्था तोकडी पडत आहे. रात्री ७ नंतर खासगी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत सापडले आहेत.
खासगी लॅबवर वचक कुणाचा?
गुरुवारी खासगी लॅबमधून ६९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सूत्रानुसार, काही लॅब क्षमतेपेक्षा जास्त नमुने गोळा करीत असल्याने व अहवाल देण्यास २४ तासांपेक्षा जास्त वेळ लावत आहेत. उशिरा अहवालामुळे रुग्णांची जोखीम वाढत आहे. या लॅबवर वचक कुणाचा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
३,०३३ अॅन्टिजन चाचणीतून ६७० पॉझिटिव्ह
शहर आणि ग्रामीण मिळून ३,०३३ रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, ३,६७८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात एम्स प्रयोगशाळेमधून १७, मेडिकलमधून १९७, मेयोमधून २०१, माफसूमधून ५७, नीरीमधून ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल, कोविड के अर सेंटरमध्ये ५,१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह अलगीकरण कक्षात ६,७२८ रुग्ण आहेत.
१५१३ रुग्ण झाले बरे
आज विविध रुग्णालयांतून १,५१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील १,३४२ तर ग्रामीणमधील १७१ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ३३,०७९ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील २६,६४९ तर ग्रामीणमधील ६,४३० रुग्ण आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७१.१५ टक्क्यांवर पोहचले आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,२७१
बाधित रुग्ण : ४६,४९०
बरे झालेले : ३३,०७९
उपचार घेत असलेले रुग्ण : ११,८९५
मृत्यू : १,५१६