मुंबईः करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञानी व्यक्त केलं आहे. सध्या राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं १५ मेनंतर लॉकडाऊनमध्ये वाढ करणार का?, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे. तिथली रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातही कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तशी शक्यता वर्तवली आहे.
‘राज्यात रुग्णांची संख्या ६०- ६५ हजारांच्या आसपास आहे. अद्याप राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला नाहीये. राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर कमी होतोय. पण काही जिल्ह्यात हा दर स्थिर आहे. काही जिल्ह्यात करोनाचा वाढता दर दिसतोय तिथं कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचं याचा विचार १५ तारखेनंतरच करण्यात येईल,’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात करोना रुग्णवाढीला थोडासा ब्रेक लागला असला तरी अजूनही दैनंदिन रुग्णसंख्या मोठीच आहे. शुक्रवारी राज्यात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्याचवेळी ३७ हजार ३८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ६ लाख ५४ हजार ७८८ इतका झाला आहे. काल दिवसभरात राज्यात ८९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १०२ मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले आहेत.