नागपूर : क्षुल्लक वादातून अवैध दारूविक्रेता व त्याच्या मुलाने २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही घटना नंदनवनमधील जीजामातानगरमध्ये घडली. करण राजकुमार मेहरा,असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी मारेकरी शामा ऊर्फ श्यामराम सखराम गडेरिया वय ४८ याला अटक केली आहे.
करण हा शिक्षण घेत होता. तो एका मॉलमध्ये काम करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, जीजामातानगरमध्ये मेहरा कुटुंबाचे घर आहे. बाजूलाच अवैध दारूविक्रेता श्यामराव गडेरिया राहतो. घराभोवती मेहरा कुटुंब संरक्षक भिंत बांधत होते. त्याला गडेरियाचा विरोध होता. ११ मे रोजी करणची आई नीलम या भिंतीजवळ उभ्या होत्या. याचवेळी श्यामराव व त्याच्या कुटुंबीयांनी नीलम यांना मारहाण करायला सुरुवात केली. एकाने नीलम यांच्यावर दगडाने वार केला. करण याचा भाऊ अर्जुन हा मदतीसाठी धावला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर गडेरिया कुटुंबीयांनी दोघांवर दगडफेक केली. नीलम व अर्जुन यांनी घरात धाव घेतली. दरवाजा बंद केला. अर्जुनने मोबाइलवर संपर्क साधून करणला घटनेची माहिती दिली. करणने पोलिसांना घटनेबाबत कळिवले. एक तासानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. नीलम यांना पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले. नीलम व अर्जुन पोलिस स्टेशनमध्ये गेले, तर करण हा मॉलमधून थेट नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये आला. गडेरियाविरोधात तक्रार दिली. गडेरिया याच्याविरुद्ध दुखापतीचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक मात्र केली नाही.
पोलिसांत तक्रार दिल्याने श्यामराव गडेरिया संतापला. रात्री करण हा घरी आला. घरासमोर मोटरसायकल पार्क करताना गडेरिया कुटुंबीयांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. करणने मदतीसाठी आरडाओरड केली. अर्जुन हा करणच्या मदतीसाठी धावला. तोपर्यंत जखमी करण बेशुद्ध झाला होता. शामा गडेरियाने अर्जुनवरही दगडफेक केली. जीव वाचविण्यासाठी अर्जुन तेथून पळाला. त्याने पोलिस नियंत्रण कक्ष व मित्राला मोबाइलवरुन घटनेची माहिती दिली. त्याचे मित्र त्याला भेटले. अर्जुन हा मित्रासह नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांनी अर्जुन याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविले. तर काही पोलिस जीजामातानगर येथे पोहोचले. करणला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून श्यामराव गडेरिया याला अटक केली.
नंदनवन पोलिसांचा हलगर्जीपणा
श्यामराव गडेरिया हा अवैधपणे दारू विकतो. त्याचे नंदनवन पोलिसांशी संबंध आहेत. पोलिस त्याच्याकडून वसुलीही करतात. ११ तारखेला तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी श्यामराव याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली नाही. पोलिसांनी वेळीच त्याच्याविरुद्ध कारवाई करत अटक केली असती, तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. मात्र पोलिसांनी हलगर्जीपणा केला,असा आरोप करणचा भाऊ अर्जुन याने केला.
अधिक वाचा : माओवाद्यांचे १९ ला ‘गडचिरोली बंद’!