माओवाद्यांचे १९ ला ‘गडचिरोली बंद’!

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी गुरुवारी अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे बॅनर लावून येत्या रविवार, १९ मे रोजी ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे. जिल्ह्यात १ मे पासून माओवाद्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून या आवाहनाच्या माध्यमातून माओवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात आपली उपस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.

माओवाद्यांनी गुरुवारी एटापल्ली तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर लाल रंगाचे कापडी बॅनर लावून आपल्या संघटनांची आक्रमकता दर्शविण्याचा प्रयत्न करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. एटापल्लीदरम्यान गुरुपल्लीजवळ बॅनर लावले असून सोबतच सर्वाधिक बॅनर हे सूरजागड ते जांबियापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. यात जांबिया येथील शासकीय औद्योगिक संस्थेसमोर तसेच समाज मंदिरासमोर हे बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या विरोधात आरोप केले आहेत.

गेल्या २७ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत रामको आणि शिल्पा या दोन महिला माओवादी ठार झाल्या होत्या. त्या चकमकीला खोटे ठरवत ‘सी-सिक्स्टी’ कमांडर पथकावरही माओवाद्यानी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान माओवाद्यांच्या पश्चिम सबझोनल समितीने मराठी भाषेत पत्रक काढले असून त्यात राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. सूरजागड येथील उत्खननावरही माओवाद्यांनी टीका केली असून अवैध पद्धतीने उत्खनन करून सुरक्षा व्यवस्थेत नेले जात असल्याचा आरोपही माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल समितीने पत्रकातून केला आहे. माओवाद्यांनी या पत्रकातून कसनासूर, बोरीया आणि २७ एप्रिलच्या चकमकीवरूनही आरोप केले आहेत. माओवाद्यांनी त्या चकमकीचा निषेध करण्यासाठी १९ मे रोजी ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे.

रामको या माओवादी महिलेने अनेक निर्दोष आदिवासींची हत्या केली आहे. आदिवासींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या माओवाद्यांच्या मृत्युंचे भांडवल करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न आहे. जनता आता त्यांच्या अशा प्रयत्नांवर विश्वास ठेवणार नाही. कुठलेही जनसमर्थन नसल्याने माओवाद्यांनी पुकारलेला बंद असफल होईल-अंकुश शिंदे, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परीक्षेत्र

अधिक वाचा : १७ जूनपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार ?