विधानसभा निवडणूक लढायची झाल्यास दक्षिण पश्चिम नागपुरातूनच लढेल

Date:

नागपूर :  ‘विधानसभा निवडणूक लढायची झाल्यास दक्षिण पश्चिम नागपुरातूनच लढेल, अन्यथा लढणार नाही’, अशी घोषणा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सगळ्या तर्कवितर्कांना विराम दिला. भाजपच्या दक्षिण पश्चिम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी हिंगणा परिसरातील ‘वाघ विला’ येथे झाला. यावेळी फडणवीसांनी तडाखेबंद भाषण केले.

पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले फडणवीस विधानसभेची निवडणूक कुठून लढणार, यावरून राज्यभर चर्चा सुरू होती. ते मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातून लढणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मंगलप्रभात लोढा जेव्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले तेव्हा त्या चर्चांना अधिक बळ मिळाले. प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करीत’फडणवीसांना राज्यातल्या २८८ मतदारसंघातून लढण्यासाठी आग्रह होत आहे. माझ्या कामठी मतदारसंघातून त्यांनी लढावे म्हणून मी आग्रही आहे. त्यांनी फक्त अर्ज भरण्यासाठी यावे, दीड लाखाच्या मताधिक्याने ते विजयी होतील’, असे भाष्य केले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, ‘मला मुंबईचे लोक विचारतात की, तुम्ही मुंबईहून लढणार का? पुण्याचे लोक विचारतात तुम्ही पुण्यातून लढणार का? मी एक स्पष्ट करू इच्छितो, मी जोवर विधानसभेची निवडणूक लढेल, तोवर दक्षिण पश्चिममधूनच लढेल. फडणवीस दक्षिण पश्चिमचे आमदार होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. माझी सगळी दारोमदार कार्यकर्त्यांवर आहे. मी नसतानाही तुम्ही ज्या पद्धतीने किल्ला लढविला, ते कौतुकास्पद आहे. यावेळीदेखील तुम्ही तो तसाच लढवाल. आपले मताधिक्य वाढवाल. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, जनतेचा आहे. त्यामुळे जनतेच्या सुखासाठी झटणे हे आपले कर्तव्य आहे. आपण पंतप्रधान मोदींच्या आदर्शावर चालून सुखी महाराष्ट्र घडवू.’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पाच वर्षांत केलेल्या कामांचा आढावाही मांडला. सोबतच ‘निवडणूक युद्धाप्रमाणे लढा. पक्ष बळकट आहेच, तो अधिक बळकट करा’, असे आवाहन केले. समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार आदींचा उल्लेख करताना मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत होत असलेली औद्योगिकीकरणातील परकीय गुंतवणूक आता राज्याच्या इतर भागातही वाढत असल्याकडे लक्ष वेधले. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related