आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय :
समाधानी आणि आनंदी लोकांच्या देशाच्या क्रमवारीत जगात भूतान पहिल्या तर भारत ११३व्या क्रमांकावर आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार विकास करीत आहे, मात्र यातून जनतेमध्ये आनंद नाही. अनेक रुग्ण असे आहेत की त्यांची सुश्रुषा करण्यास कोणी नसते, यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. रुग्णात आनंद निर्माण करण्यासाठी मनोधारणा महत्त्वाची आहे.
देशासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे, अशी भावना तयार करण्यासाठी राज्य शासन समाजातील दु:ख संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सकारात्मकता बाजारात विकत मिळत नाही, सकारात्मकतेचा प्रयोग महाराष्ट्राच्या विकासाला मदत करणारा ठरणार आहे. यामुळे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्य़ा पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘महाराष्ट्र गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे योगदान’ या विषयावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.
भूतानची संकल्पना
- १९७९ मध्ये भूतानच्या राजाने देशाच्या विकासाचा पर्यायी निर्देशक म्हणून ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली.
- २००८ मध्ये भूतानच्या राज्यघटनेत या संकल्पनेचा समावेश.
- भूतानच्या पावलावर पाऊल ठेवत व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांत आनंद मंत्रालयांची स्थापना.
- भारतात ऑगस्ट २०१६ मध्ये सर्वप्रथम मध्य प्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना.
- एप्रिल २०१८ मध्ये आंध्र प्रदेशात आनंद निर्देशांकानुसार विकासाचे मापन सुरू.
अधिक वाचा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही आता थेट बँक खात्यात : पंकजा मुंडे