नागपूर : गिट्टीखदानमध्ये टोळीयुद्ध

नागपूर : गिट्टीखदानमध्ये टोळीयुद्धातून अपहरण करून एका युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सुयोगनगरमधील पलांदुरकर ले-आऊट येथे घडली. रवी विलास धांडे रा.शिवाजीनगर,असे जखमीचे तर चारुदत्त नरभरिया, सोम वर्मा ,आकाश पवार ऊर्फ बोक्या व कल्याण मिश्रा, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी आकाश याला अटक केली आहे. सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.

रवी याचा मित्र विक्की चव्हाण हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला. त्याचा चारुदत्त टोळीसोबत वाद सुरू आहे. शनिवारी विक्की चव्हाण, रवी, सनी मेश्राम, विक्की टुले, इशांत राऊत मनोज भांदे हे सुयोगनगर भागात दारु पित होते. यादरम्यान विक्की तेथून घरी गेला. विक्की हा सुयोगनगरमध्ये दारु पित असल्याची माहिती चारुदत्त व त्याच्या साथीदारांना मिळाली. चारुदत्त व त्याचे साथीदार तेथे पोहोचले. विक्कीबाबत विचारणा केली. यावरून रवी व त्यांचा वाद झाला. चारुदत्तच्या टोळीने रवी याचे अपहरण केले. धारदार शस्त्रांनी वार करून त्याला जखमी केले. रवी याला वेलट्रिट हॉस्पिटलजवळ सोडून हल्लेखोर पसार झाले.

रवी याच्यावर याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रवी याचा मित्र योगेश सुरेश सिरसवार याने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून आकाश याला अटक केली आहे.

अधिक वाचा : घरफोड्यांनी हादरली उपराजधानी