नागपूर : भाजपवर टीकेची झोड उठवत मागच्या वर्षी काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातच उमेदवारी मागितली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने उमेदवारीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 18 जानेवारीपर्यंत इच्छुकांचे अर्ज प्रदेश सादर करायचे आहेत.
नागपुरातून माजी आमदार आशिष देशमुख यांचा पहिलाच अर्ज आला आहे. गेल्यावर्षी देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी नागपुरात गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची एकतर्फी घोषणा केली होती. मात्र, आता त्यांनी अधिकृतरीत्या पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसकडे नागपूरसाठी अनेक दावेदार आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसचे प्रभारी म्हणून यश मिळवणारे सरचिटणीस माजी खासदार अविनाश पांडे, शहराध्यक्ष विकास ठाकरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रफुल्ल गुडधे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
याशिवाय, भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांनीही नागपुरातून लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नागपुरात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी अभूतपूर्व अशी रस्सीखेच बघायला मिळते आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव निश्चित आहे. त्यामुळे गडकरी यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याला लढत देण्यासाठी सारेच इच्छुक आहेत. शेजारच्या रामटेक मतदारसंघासाठीही मंगळवारपासून संभाव्य उमेदवारांचे अर्ज मागवले जाणार असून रामटेकसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक पुन्हा उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगण्यात येते.
अधिक वाचा : Nitin Gadkari holds up Indira as model of women empowerment