नागपूर : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषदा राज्य सरकारने बरखास्त केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी आयोगातर्फे या पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयांची या निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे की नाही, याचा आढावा या कॉन्फरन्स दरम्यान घेण्यात आला तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याच्या सूचना यावेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावरून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच लागणार असे संकेत दिसून येत आहे. त्यामुळे कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्य सरकारने तातडीने या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आणला तसेच त्या बरखास्त केल्या. या सर्वच जिल्हा परिषदांवर प्रशासक नेमण्यात आला. राज्य सरकारने तसा आदेशच काढला. नागपूर जिल्हा परिषदेला सुमारे सव्वादोन वर्षांची मुदतवाढ मिळाली होती, हे विशेष. त्यामुळे पुढील ३० दिवसांमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणूका घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी पाचही जि. प.च्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून आढावा घेतला. यावरून निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार असल्याचे संकेत आहेत.
जुन्याच सर्कल रचना कायम
आजवर या निवडणुकीसाठी तीनदा सर्कल रचना व आरक्षणाची सोडत झाली आहे. अलीकडेच मे महिन्यात ही प्रक्रिया तिसऱ्यांदा पार पडली. त्यामुळे मे महिन्यात काढण्यात आलेल्या आरक्षणानुसारच निवडणुका होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने शहरातील बड्या औषध व्यापाऱ्याची आत्महत्या