प्रयागराज: उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये असलेल्या एका पुलावरून एकाच कुटुंबातील ५ जणांनी नदीत उडी घेतली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी कुटुंबाला नदीत उडी मारताना पाहिलं. मात्र कोणी मदतीला पोहोचणार, त्याआधीच कुटुंबानं नदीत उड्या घेतल्या. मात्र पुलाखाली अनेक नाविक होते. त्यांनी बुडणाऱ्या कुटुंबाला वाचवलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि कुटुंबाला रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातल्या रेवामधून कुटुंब १२० किलोमीटर अंतर कापून प्रयागराजला आलं होतं. कुटुंबातील ५ सदस्यांनी एकाचवेळी पुलावरून नदीत उडी घेतली. रोहिणी तिवारी यांनी त्यांची मुलगी रुपाली (२४), मनाली (२२), श्रेया (१८) आणि मुलगा अंश (१५) यांच्यासह नैनी पुलावरून आत्महत्या करण्याच्या हेतून पुलावरून उडी मारली. पुलाखाली असलेल्या नावाड्यांनी या संपूर्ण कुटुंबाला वाचवलं. रोहिणी आणि एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. कौटुंबिक वादामुळे हे ५ जण आत्महत्या करण्यास प्रयागराजला आले होते.
प्रयागराजमधील किडगंज पोलिसांनी आत्महत्या करण्यास आलेल्या कुटुंबियांची विचारपूस केली. आई रोहिणी आणि मुलगी रुपाली, मनालीनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण एकसारखंच आहे. पती राधाकृष्ण तिवारी मुलांकडे दुर्लक्ष करून त्यांना शत्रूसारखी वागवत असल्याचं रोहिणी यांनी पोलिसांना सांगितलं. तर वडील मोठ्या भावाच्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देतात. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करतात, असं रुपाली आणि मनालीनं पोलिसांना सांगितलं. वडिलांमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचंदेखील त्यांनी म्हटलं.