दुधासाठी पित्याने पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईने बाळाला साेडले रस्त्यावर

दुधासाठी पित्याने पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईने बाळाला साेडले रस्त्यावर

मुंबई : कोरोनामुळे आधीच उपासमारीची वेळ ओढवली असतानाच प्रियकर असलेल्या बाळाच्या पित्यानेही मुलाच्या दुधासाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईने भुकेने व्याकुळ झालेल्या चार ते पाच महिन्यांच्या बाळाला चिंधी बाजारातील फूटपाथजवळ सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र सुदैवाने हे बाळ एका मातेला सापडले. तिने त्याला दूध पाजून पोलिसांच्या हवाली केले. पुढे जे. जे. मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आईचा शोध घेत तिला बेलापूरमधून अटक केली.

दोन टाकी परिसरात राहणाऱ्या रूपा माथुन दंतानी (वय ४०) यांचा चिंधीचा व्यापार आहे. शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे दोन टाकी परिसरात चिंंधी विकण्यासाठी गेल्या. चिंधी विकत असताना सहाच्या सुमारास लहान बाळाचा रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता मागच्या पदपथाजवळ त्यांना चार ते पाच महिन्यांचे बाळ रडताना दिसले.
त्यांनी त्या बाळाला ताब्यात घेत, परिसरात सर्वत्र चौकशी केली, बाळाला भूक लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बाळाच्या दुधाची व्यवस्था केली. पालक बाळाला शोधत येतील असे समजून बाळाला सोबत ठेवले. दोन तास उलटूनही बाळाची आई न आल्याने त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून बाळाला पोलिसांच्या ताब्यात देत, तक्रार दाखल केली.

त्यानुसार, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पोवार, जमादार व पथकाने आईचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही आणि स्थानिक खबऱ्यांमार्फत शोध घेत बेलापूरमधून तिला ताब्यात घेतले.
महिलेकडे केलेल्या चौकशीनुसार, तिचे दोन विवाह झाले असून दोन्हीही पती तिला सोडून गेले. सध्या ती प्रियकरासोबत बेलापूरमध्ये राहते. त्यांना बाळ आहे. तिच्या प्रियकराचा दोन टाकी परिसरातील चिंधी बाजारात व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि. ७) ती बाळासह तेथे गेली. बाळाच्या दुधासाठी तिने त्याच्याकडे पैसे मागितले. मात्र प्रियकराने पैसे न दिल्याने रागाने ती तेथून निघून गेली. पुढे तेथील पदपथावर बाळाला सोडून घर गाठल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार २९ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिला जामिनावर साेडण्यात आले.

बाळाची रवानगी बालगृहात                                                                                                        आईच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा देत, बाळाला बालगृहात पाठविण्यात आल्याची माहिती जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी दिली.

एकीने नाकारले, दुसरीने जीवदान दिले                                                                                      रागाने आईने बाळाला रस्त्यावर साेडले, मात्र ते एका मातेला सापडले. तिने त्याला दूध पाजून पोलिसांच्या हवाली केले. पुढे जे. जे. मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने त्याच्या निर्दयी आईचा शोध घेत तिला बेलापूरमधून अटक केली.