राज्य सरकारचा मोठा निर्णय: ग्रामपंचायतीची निवडणूक नंतरच सरपंचपदासाठी सोडत

Date:

मुंबई – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या आणि मुदत संपलेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र या ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी जानेवारीमध्ये आरक्षण सोडत होणार आहे.

राज्याच्या ग्रामविकास खात्याने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. सरपंचपदासाठी होणार घोडेबाजार थांबावा, तसेच खोटी जात प्रमाणपत्रे दाखवून निवडणुका लढवण्याचे प्रकार वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. ते आरक्षणही या नव्या आदेशानंतर रद्द करण्यात आले आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान; तर १८ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली. यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण रंगणार आहे.

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोनाची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरपर्यंत
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत असेल.

२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रा.पं.ची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमदनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४२३४.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...