‘लादेन किलर’ अपाचे हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल

नागपूर : अमेरिकेचे ए-६४५(I) हे अपाचे हेलिकॉप्टर आज भारताकडे अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील मेसा शहरातील विमानांच्या कारखान्यात हस्तांतरित करण्यात आलं आहे. भारताचे एअर मार्शल ए.एस बुटोला यांनी यावेळी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या २२ अत्याधुनिक अपाचे विमानांचा करार भारताने अमेरिकेशी केला असून जुलै २०१९पर्यंत सगळी विमानं वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. कुख्यात दहशतवादी आणि अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी या लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता.

भारत आतापर्यंत रशियाकडून विकत घेतलेल्या मिग-३५ हेलिकॉप्टर्सचा वापर करत होता. ही हेलिकॉप्टर्स आता अत्यंत जुनी झाली असून भारताला नवीन हेलिकॉप्टर्सची गरज होती. त्यानुसार २२ अपाचे हेलिकॉप्टर्सचा करार अमेरिकेशी करण्यात आला.

अपाचेसारखी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेने कधीच वापरली नव्हती. त्यामुळे भारतीय वायुसेनेतील काही निवडक ऑफिसर्स आणि जवानांना हे हेलिकॉप्टर्स वापरण्याचं प्रशिक्षण अमेरिकेने दिलं आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. १९७५मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर १९८६मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.

डोंगराळ भागात, कोणत्याही ऋतूमध्ये-पावसाळा, हिवाळा असो वा उन्हाळा ही हेलिकॉप्टर्स सहज आक्रमण करू शकतात. ५१६५ किलो वजन असलेल्या या विमानांचा ताशी वेग ३६५ किमी इतका आहे. काही क्षणांमध्ये शत्रूचे रनगाडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये झालेल्या युद्धांमध्ये अमेरिकेला या हेलिकॉप्टर्सची भरपूर मदत झाली होती.

अधिक वाचा : MSEDCL asks SNDL to ensure uninterrupted power supply

Comments

comments