पालघर: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना ताजी असतानाच आज पालघर जिल्ह्यात आगीची भयंकर घटना घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ या कोविड रुग्णालयात आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
विरारमधील तिरुपती नगरातील बंजारा हॉटेलच्या मागे विजय वल्लभ हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदभता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली. आयसीयूधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानं ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ हालचाली करून काही रुग्णांना वाचवले. मात्र, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाच महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती वसई-विरार महापालिकेनं दिली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं आहे.
मृतांची नावं:
निलेश भोईर (वय ३५), उमा सुरेश कनगुटकर (६३), पुखराज वल्लभदास वैष्णव (६८), रजनी आर कडू (६०), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे(६३), नरेंद्र शंकर शिंदे (५८), रमेश टी उपयान (५५), कुमार किशोर दोशी (४५), शमा अण्णा म्हात्रे (४८), सुप्रिया देशमुख (४३), प्रविण शिवलाल गौडा (६५), अमेय राजेश राऊत (२३), सुवर्णा एस पितळे (६४)