नागपूर : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सक्रिय प्रचार करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली उच्च पातळीवर जोरदारपणे सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. १७ जूनपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने लोकसभेचे तिकीट दिले होते. विखे यांनी भाजप व शिवसेनेचा उघड प्रचार लोकसभा निवडणुकी दरम्यान केला होता. त्याचबरोबर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी ही उघडपणे भाजपचा प्रचार केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल व त्यात विखे आणि क्षीरसागर यांचा समावेश केला जाईल, असे बोलले जाते.
बंडखोरांचीही वर्णी, सेनेला आणखी पदे ?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बंडखोर आमदारांची वर्णी विस्तारात लावली जाईल. भाजपचे नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी खात्याचा भार गेले अनेक महिने चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट जिंकले तर हे खाते ही रिक्त होईल. त्याचप्रमाणे काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. शिवसेनेलाही आणखी मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. शिवसेना आपल्या वरिष्ठ मंत्र्यांची उचलबांगडी करते किंवा कसे हेदेखील पुढच्या रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक वाचा : 20 से दमक्षेसां केंद्र में 11 राज्यों की कला शैलियों पर कार्यशाला