शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ

मुंबई : शालिमार एक्स्प्रेसमध्यये स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके जिलेटीनच्या कांड्या असून या वस्तूंसह वायर, बॅटरी आढळून आल्या. या वस्तूंसह एक पत्र आढळून आले असून पत्रात भाजप सरकारविरोधी मजकूर आढळला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेसचे आगमन झाल्यानंतर सफाईसाठी कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. एक्स्प्रेसच्या डब्याची सफाई करताना कर्मचाऱ्यांना स्फोटकंसदृश्य संशयित वस्तू आढळली. त्यामुळे खळबळ उडाली.

तातडीने रेल्वे पोलीस, आरपीएफच्या जवानांनी धाव घेतली. या वस्तूची पाहणी केल्यानंतर जिलेटीनच्या कांड्यांसह फटाकेदेखील आढळले. वस्तूंसोबत आढळलेल्या पत्रात भाजप सरकारला इशारा देण्यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचा मजकूर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. पत्रात काही सांकेतिक भाषांचा वापर करण्यात आला होता.

घटनास्थळी रेल्वे पोलिसांसह, श्वान पथक आणि बॉम्बनाशक पथकही दाखल झाले होते. ही स्फोटके निकामी करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा : नागपूर : गुन्हेगाराचा पंजा छाटला