नागपूर : कॉर्पोरेट क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करताना सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यासही अडचणी आल्या होत्या. यासाठी तोट्यात असल्याचे कारण देण्यात आले होते. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत कंपनीला सतत तोटा असल्याचा पार्श्वभूमीवर आता बीएसएनएलने त्यांचे तोट्यात असलेले एक्स्चेंज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
गेल्या काही वर्षांत कंपनीला तोटा सहन करावा लागत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे बीएसएनएलने असे तोट्यात असलेले अनेक एक्स्चेंज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला आहे. लॅण्डलाइन सुविधा व देखभाल दुरुस्ती यासाठी अनेक भागांत बीएसएनएलने एक्स्चेंज उभारले गेले आहेत. त्यामुळे अशा एक्स्चेंजशी निगडित लॅन्डलाइन सेवा देण्याऐवजी मोबाइल सेवा देण्यावर कंपनीचा भर राहील, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. लॅण्डलाइन सेवा हा आता तोट्यातील व्यवसाय मानला जातो. ग्रामीण भागात लॅण्डलाइनचे अत्यंत कमी कनेक्शन आहेत. मात्र, यासाठी स्वतंत्र एक्स्चेंज आहेत. त्यातच यातून मिळणारा महसूलही अत्यंत कमी आहे. याउलट, वीजबिल आणि इतर देखभाल दुरुस्तीवर खर्चही अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे असे सर्व एक्स्चेंज बंद करणे अधिक सोयीचे असल्याची माहिती आहे. दरम्यान, एक्स्चेंज बंद केल्यानंतर सेवा सुरू ठेवण्याचा पर्याय म्हणजे मोबाइल कनेक्शन्सची संख्या वाढवणे, हा त्यावरचा पर्याय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एक्स्चेंज चालवताना वीजबिलांचा खर्च हा सर्वाधिक असतो. यासाठी बीएसएनएलने पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्याऐवजी सौरऊर्जा आणि उच्चदाब कनेक्शन्सवरून लघुदाब कनेक्शन वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे वीजबिलात कपात झाली आहे. मात्र, या उपाययोजना पुरेशा नसल्याचे पुढे आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएलचा महाराष्ट्र सर्कल हा आर्थिकृष्ट्या मजबूत आहे. या सर्कलचा महसूल ३५० कोटी इतका आहे. मात्र, वसुलीतून येणारी रक्कम ही बीएसएनएलच्या एकूण खात्यात जाते, ज्यावरून कंपनीची सर्वसाधारण स्थिती कशी आहे, हे निश्चित होते. त्यामुळे महाराष्ट्र सर्कल आर्थिकदृष्ट्या सक्षम असला तरी एकूण कंपनीची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एक दिवसाआधीच पगार
वेतन देण्यास असमर्थ ठरल्यानंतर बीएसएनएलने गेल्या महिन्याचा पगार ३१ मार्च म्हणजे पगार होण्याच्या एक दिवस आधी ३० मार्चलाच दिल्याची माहिती कंपनीच्या कामगार संघटनांनी दिली. विशेष म्हणजे पगाराबरोबरच इतरही सर्वच थकबाकीची रक्कम देण्यात आल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : All set for Shriram Janmotsav Shobhayatra in West Nagpur