नागपूर : भागीदारीत बुटीबोरी येथे प्लास्टिक कंपनी स्थापन करण्याचे आमिष दाखवून फळ व्यापाऱ्याचे ८५ लाख रुपये घेऊन उद्योजक पसार झाला. ही घटना तहसीलमधील टिमकी भागात उघडकीस आली. फळव्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी उद्योजकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राजेश हिरालाल नैकले (रा. सेवासदन, सेंट्रल एव्हेन्यू) असे फरार उद्योजकाचे तर नवीन रतनलाल पुरे (वय ३९, रा. टिमकी) असे फसवणूक झालेल्या फळव्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन यांचा फळाचा व्यापार आहे. राजेशची प्लास्टिकची कंपनी असून, तो नवीन यांचा आतेभाऊ आहे.
२०१४ मध्ये त्याने नवीन यांना भागीदारातील बुटीबोरी येथे प्लास्टिकची कंपनी सुरू करण्याचे आमिष दाखविले. भाऊच असल्याने राजेश फसवणूक करणार नाही, अशी नवीन यांना खात्री होती. त्यांनी स्वत: जमा केलेले पैसे तसेच नातेवाइकांकडून उधार घेऊन राजेश याला ८५ लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही त्याने फॅक्टरी सुरू केली नाही. राजेश याने नवीन यांना फॅक्टरी खरेदीची व प्लॉटखरेदीची छायांकित प्रत देऊन बनावट करारनामा केला.
८५ लाख घेऊन राजेश कुटुंबासह पसार झाला. नवीन यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तीन वर्षांपासून होता तयारीत
राजेश हा गत तीन वर्षांपासून फरार होण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. २०१६ पासून त्याने मुलीचा महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. तसेच नागपुरातील सर्व व्यवसाय बंद केले होते. कर्ज काढून त्याने घर खरेदी केले. हप्ते न फेडल्याने बँकेने त्याचे घर जप्त केले होते, अशी माहिती आहे.
अधिक वाचा : Sitabuldi cops detain 4 juveniles, recover 10 stolen motorcycles