‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी

नागपुर:  सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपुरातील एका माजी मंत्र्यांशी संबधीत प्रकरणाशी हे छापे असल्याची माहिती आहे. मात्र या कारवाई संदर्भात ईडीच्या कोणत्याही अधिकार्‍यांने दुजोरा दिलेला नाही.

बुधवारी (दि १६) मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. त्यानंतर स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने पथकाने एकाच वेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले. अद्यापही ही कारवाई सुरूच आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नागपुरातील एका माजी मंत्र्याच्या प्रकरणात चौकशी दरम्यान कोलकाता येथे दोन बनावट कंपन्यांचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे काही व्यवहार झाले असा संशय सीबीआयला असल्याची माहिती आहे. सीबीआयने याबाबत ईडीला माहिती दिल्यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या तीन पथकांनी २५ मे रोजी अंबाझरीतील शिवाजीनगर येथील हरे कृष्ण अपार्टमेंट, सदरमधील न्यू कॉलनी, आणि गिट्टीखदानमधील जाफरनगर येथे तिघांकडे छापे टाकले. तब्बल पाच तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिघांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा तीन ठिकाणी ईडी ने झाडाझडती घेतली आहे त्यामुळे संबधित माजी मंत्र्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.