दाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील मनीषनगर येथील ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी स्वत: अत्यवस्थ असताना करोनाबाधित तरुणासाठी बेड सोडल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेबाबत माहिती अधिकारातून माहिती घेतली असता दाभाडकरांनी बेड सोडला नव्हता तर जावई आणि मुलीने त्यांची प्रकृती गंभीर असल्याने घरी नेले होते, असा तपशील समोर आला आहे.

दरम्यान, या माहितीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रीय सयंसेवक संघावर टीका केली असून भाजप आणि संघाने दाभाडकर यांच्या मृत्यूचा वापर प्रतिमा संवर्धनासाठी केला आहे. ’माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी हा तपशील माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त झाला. गुरुवारी सचिन सावंत यांनी ही माहिती ट्विट केली आहे. नारायण दाभाडकर हे २२ एप्रिलला नागपूर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी परतले होते. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यात ‘मी आता ८४ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगून घेतले. मला उपचाराची गरज नाही. माझा बेड तुम्ही या गरजू रुग्णाला द्या आणि त्याच्यावर उपचार करा’, असे सांगून ते घरी परतले असा उल्लेख होता. दाभाडकर यांच्यासंदर्भातील कथित त्यागाची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी दाभाडकर त्यांच्या या त्यागाचे कौतुक केले होते. दरम्यान, रुग्णालयानेच याबाबत खुलासा केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू होते.

मोहनिश जबलपुरे यांना रुग्णालयातून प्राप्त माहितीमध्ये दाभाडकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाला दिलेल्या पत्राचा समावेश आहे. त्यात दाभाडकर यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावलेली असतानाही त्यांनी रुग्णालय सोडण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण त्यात आहे. ‘रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती व रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी इतर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा दाभाडकर यांनी व त्यांच्या जावयाने स्वत:च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली’, असे त्या पत्रातून स्पष्ट होते.

या पत्रात कोणत्याही तरुणासाठी किंवा इतर कोणासाठीही बेड सोडला नसल्याचा उल्लेख नाही. सावंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘दिवंगत नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूचा उपयोग संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपने केला. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान व अनेक भाजपा संघाचे नेते सहभागी झाले. वस्तुस्थिती माहिती अधिकारात समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती. पेशंटची स्थिती गंभीर असल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. दाभाडकर यांनी स्वतः व त्यांच्या जावयाने स्वतः च्या जबाबदारी वर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली. या पत्रात कोणत्याही तरुणाचा उल्लेख नाही. या माहिती नंतरही दिवंगत दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे हे अयोग्य आहे. त्यांनी जरी असे पाऊल उचलले असते तरी त्याचा संघाशी संबंध जोडणे हे उचित नव्हते. ’

याबाबत दाभाडकर यांच्या कन्या आसावरी कोठीवान-दाभाडकर यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे, त्यात म्हटलंय, ‘मृत्यूचे भांडवल करायचे नव्हते आम्हाला त्यांच्या मृत्यूचे भांडवल करायचे नाही. याआधी देखील चित्रफितीद्वारे हे स्पष्ट केले होते. भांडवल करायचे नव्हते म्हणून रुग्णालयाला दिलेल्या माहितीत आम्ही तसे काही नमूद केले नाही. परंतु आपला ऑक्सिजन काढून इतर कुणाला देण्यासारखा त्याग नाही. दाभाडकर समाजासाठी आदर्श आहेत.’