कोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी

Date:

नागपूर : कोव्हिड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोव्हिडचे एक लक्षण असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोव्हिडमुळे उद्भवलेले लॉकडाउन आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोव्हिडच्या या काळात नियमित मास्क लावा, याशिवाय डोळ्यांचीही काळजी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक तथा ग्रीन सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राफत खान आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तथा नियाक्षी आय हॉस्पिटलचे डॉ.विरल शाह यांनी दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी बुधवारी (ता.३०) ‘कोव्हिड आणि डोळ्यांची निगा’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकांचे निरसरनही केले.

कोव्हिड हा अत्यंत धोकादायक आजार आहे. त्यामुळे त्याला अगदी सहज घेउ नका, त्याचे गंभीर परिणाम लक्षात घेउन काळजी घ्या, नियमांचे पालन करा. कोव्हिडमुळे ज्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते नेत्र शल्यचिकित्सक होते. त्यामुळे डोळ्यांमधून होणारा संसर्ग हा नाक आणि तोंडातून होणा-या संसर्गा एवढाच घातक आहे. त्यामुळे डोळ्यांमुळे संसर्ग होउ नये यासाठी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा. अनेक जण ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावतात मात्र ते लावताना आधीपेक्षा जास्त सुरक्षा घेणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे कोव्हिड संसर्गाचा धोका निर्माण होतो. ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा, सॅनिटाजरचा वापर करून शक्यतो डोळ्यांना हात लावू नका. कोव्हिडच्या या संकटात शक्य असल्यास ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ टाळा आणि चष्मा वापरा. चष्मा डोळ्यांना थेट संपर्कापासून सुरक्षित ठेवतो. स्वत:च्या मताने डोळ्यांबाबत कुठलेही उपचार करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. दवाखान्यात जाणे शक्य नसल्यास फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आवाहन यावेळी डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी केले.

२०-२०-२०चे सूत्र अंगिकारा

आज कोव्हिडच्या काळात डोळ्यांच्या समस्या सुद्धा वाढल्या आहेत. डोळे लाल होणे, जळजळ होणे अशा अनेक तक्रारी रुग्णांच्या येत आहेत. लॉकडाउन, विलगीकरण किंवा ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये आपला जास्तीत जास्त संपर्क मोबाईल, लॅपटॉप, टिव्हीसोबत येतो. एकटक मोबाईल, लॅपटॉप किंवा टिव्ही पाहत असल्याने डोळ्यांमध्ये ओलावा ठेवणारा अश्रुंचा थर कमीकमी होत जातो. त्यामुळे अनेक त्रास सुरू होतात. यावर उपाय म्हणून २०-२०-२०चे सूत्र अंगिकारा मोबाईल, लॅपटॉप किंवा टिव्ही पाहत असताना किंवा त्यावर काम करत असताना प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घ्या, या ब्रेकमध्ये किमान २० मीटर दूर पर्यंत पाहा, आकाश, झाडे, खिडकीबाहेरचा परिसर पाहा, पापण्यांची उघडझाप करा, असेही त्यांनी सांगितले.

मास्क लावल्याने तोंड आणि नाकातून निघणारी वाफ डोळ्यात जाते त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे होण्याची शक्यता असते. याशिवाय एसी मध्ये काम करताना, कमी प्रकाशात काम करतानाही ही समस्या उद्भवू शकते. यासाठी आवश्यक काळजी घ्या, एसीकडे तोंड करून बसू नका, काम करताना भरपूर प्रकाश असू द्या, रात्री मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही पाहत असताना दिवे सुरू ठेवा, काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असाही मोलाचा सल्ला यावेळी डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी दिला.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...