नागपूर : कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले असून नवरात्रीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनावश्यक गर्दी टाळून कोविडच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ते म्हणाले केवळ ओनम पर्वासाठी अनेक प्रतिबंध हटविण्यात आले होते. त्यानंतर तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात असे व्हायला नको. नवरात्र, दसरा, दिवाळीसारख्या सणात उत्साहाचे वातावरण राहते. नागरिक घराबाहेर पडतात. तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव थंडीच्या दिवसात वाढून अजून एक लाट येऊ शकते. त्यांनी नागरिकांना वारंवार हात धुणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर न पडणे, भाज्या, फळ आदींना धुतल्यानंतर त्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स ठेवण्याचे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
प्लाझ्मा दानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा
जिल्ह्यात रविवारपर्यंत ८१,३५९ रुग्ण बरे झाले आहेत. यात ग्रामीण भागातील १६,८९६ आणि शहरातील ६४,४६३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत मेयो-मेडिकलमध्ये १०० पेक्षा अधिक प्लाझ्माचे नमुने मिळाले आहेत. ८० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले आहेत.