मेयो कोविड हॉस्पिटल : सोमवारी मेयोच्या ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ७६ रुग्ण भरती होते

कोविड हॉस्पिटल

नागपूर : सप्टेंबर महिन्यात सरासरी १५०० ते २००० हजार रुग्ण वाढत होते. त्यातच बेड मिळण्यासाठी अनेक रुग्णांना अडचणी येत होत्या. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. सोमवारी मेयोच्या ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ७६ रुग्ण भरती होते. कोरोना आटोक्यात येतोय का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आज ४५७ रुग्ण १९ मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ९१,१३२ तर मृतांची संख्या २,९६६ वर गेली.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) शस्त्रक्रियेच्या रुग्णांवर अद्ययावत उपचार होण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सर्जरी कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत आले. येथे जनरल सर्जरीपासून ते अस्थिरोग, नेत्ररोग, ईएनटी आदी विभागाचे वॉर्ड व मॉडर्न शस्त्रक्रिया गृह आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जून महिन्यात सर्जरी कॉम्प्लेक्सला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे स्वरुप देण्यात आले. यामुळे येथील संपूर्ण विभाग केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित झाले. किरकोळ शस्त्रक्रिया सोडल्यास मोठ्या व तातडीच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या. त्यावेळी शस्त्रक्रियेच्या रुग्णांची संख्याही कमी होती. गरजू रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात होते. परंतु आता कोविडच्या तुलनेत नॉनकोविडचे रुग्ण वाढत आहे. यातच कोविडच्या मोठ्या संख्येत खाटा रिकाम्या राहत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

शहरात ३२१ तर ग्रामीणमध्ये १३१ रुग्ण

मागील आठवड्यात ६७४, त्यापूर्वीच्या आठवड्यात ९७६ रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली. या आठवड्याची सुरुवात पाचशेखाली झाली आहे. आज शहरात ३२१, ग्रामीणमध्ये १३१ तर जिल्ह्याबाहेरील पाच बाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच मागील दोन दिवसांत मृत्यूची नोंद २२च्या खाली आली. शहरात आज १०, ग्रामीणमध्ये चार तर जिल्हाबाहेर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ८९.८२ टक्क्यांवर गेली आहे. सध्या ६३१० अ‍ॅक्टिव्ह आहेत.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ६,८१३

बाधित रुग्ण : ९१,१३२

बरे झालेले : ८१,८५६

उपचार घेत असलेले रुग्ण : ६,३१०

मृत्यू :२,९६६