नागपूर,ता. १६ : नागपूर शहरातील कचरा संकलन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे नवीन दोन यंत्रणेची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन यंत्रणेमार्फत कचरा संकलन करण्याचे कामे १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. ही यंत्रणा आपल्या घरातील कचरा वर्गीकृत करूनच घेणार आहे. सुरूवातीला याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे सोपवावा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. शिवाय यासंबंधात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत शनिवारी (ता. १६) यंत्रणेच्या कार्याबद्दलची समीक्षा बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, यंत्रणा ही नवीन असल्याने सुरूवातीला काम करायला थोडा त्रास जाईल. काही सजग नागरिक कचरा विलग करून देतील परंतु सर्वच नागरिक कचरा विलग करू देणार नाहीत. याबाबत यंत्रणेमार्फत नागरिकांना जागरुक करणे आवश्यक आहे. २० तारखेपर्यंत नागरिकांना याबाबत अवगत करावे. २० तारखेनंतर कुठल्याही घरातून कचरा एकत्रित घेऊ नका, असे निर्देश आयुक्तांनी कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला दिले आहेत. जोपर्यंत यंत्रणा सुरळीत कार्य करीत नाही, तोपर्यंत दररोज समीक्षा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांनी यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कार्याचा आढावा जाणून घेतला. यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्याचे दिसून आले. त्या तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी यंत्रणेला दिले.
आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी नवीन यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती सांगितली. आतापर्यंत शहरात १७० कचरा संकलन केंद्र होते. आता नवीन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनुसार फक्त २५ ट्रांन्सफर युनीट असणार आहेत. यामध्ये गाडीतून कचरा मोठ्या गाडीत टाकल्या जाणार आहे. तेथूनच तो कचरा प्रक्रीया केंद्रावर पाठविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कचऱ्याचा पुरेपूर उपयोग करून त्यावर प्रक्रिया करणार असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
यावेळी जुन्या कचरा संकलन यंत्रणा कनक रिसोर्सच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी बैठकीत मांडला. यावर बोलताना आयुक्त यांनी कनकच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी अट निविदेमध्ये समाविष्ट केली असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
कचरा वर्गीकृत करून देण्याचे नागरिकांना आवाहन
आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी महानगरपालिका प्रय़त्नरत आहे. नागरिकांनी मनपाच्या प्रयत्नांना सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा ओला सुका वर्गीकृत करून द्यावा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.