महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं जुळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं राष्ट्रवादीचं कौतुक!

Narendra Modi

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत भाषण केलं. राज्यसभेच्या बैठकीचं हे 250वं सत्र असल्यानं पंतप्रधानांनी भाषणात संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या योगदानाची चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले, लोकांच्या भाव-भावनांचं हे सभागृह प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेच्या माध्यमातूनच देशासाठी मोठं योगदान दिलं. त्यामुळे राज्यसभेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र हे करताना राज्यसभेनेनं अडवणुकीचं कारण न बनता प्रवाही राहावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं आणि हे करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुक केलं. पंतप्रधान म्हणाले, आंदोलनं आणि इतर कारणांमुळे संसदेचा वेळ वाया जातो. राज्यसभेत विविध मुद्यांवर अधिक गंभीरपणे आणि विस्तृत चर्चा होणं अपेक्षीत आहे.

मात्र गोंधळ आणि गदारोळात आजकाल सगळा वेळ वाया जातो. त्यातून काहीही निघत नाही. याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे. राजकीय पक्षांनीही विरोध करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतली होती की विरोध करत असताना कधीही सभागृहाच्या ‘वेल’मध्ये उतरणार नाही. अशीच भूमिका भाजपनेही घेतली होती आणि मला सांगताना आनंद वाटतो की राष्ट्रवादीने अनेक कठीण प्रसंगातही या भूमिकेचं पालन केलं. भाजपनेही हा नियम पाळला आणि हे करत असताना त्याचा कुठलाही राजकीय तोटा राष्ट्रवादी आणि भाजपलाही झाला नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक करण्याला वेगळं महत्त्व असून भाजपचं हे नवं महाराष्ट्र कनेक्शन आहे का याची चर्चा सुरू झालीय.

शिवसेनेची झाली कोंडी

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून दररोज नवनवी समीकऱणं मांडली जात आहेत. त्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या वेगळ्याच वक्तव्याने गोंधळ निर्माण होत आहे. निकाल लागल्यानंतर सेनेनं जे ठरलं ते झालं पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यावर भाजपकडून सकारात्मक उत्तर मिळालं नाही. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि भाजपने आपण सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगितलं.

‘अमित शहांनी सांगितलंय, राज्यात भाजप-सेनेचं सरकार येणार’

भाजप आणि शिवसेनेनं निवडणूक जरी एकत्र लढवली असली तरी निकालानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदामुळे वाद निर्माण झाला. अखेर त्यांची युती तुटण्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. मात्र त्यांनाही वेळेत दावा करता आला नाही. सेनेची वेळ संपल्यावर राष्ट्रवादीला संधी दिली. त्यांनी सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ मागितली पण राज्यपालांनी नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि गेल्या आठवड्यात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिल्यांदा सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपने पुन्हा आमचंच सरकार येणार असा दावा केला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सातत्याने भाजपवर टीका करताना आघाडीच्या नेत्यांसोबतच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच सेनेचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं. याशिवाय राऊत यांनी 170 ते 175 आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावाही राऊत यांनी केला.