नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एखाद्या व्यक्तीला मुद्दाम लक्ष्य करण्याच्या व्यक्तिगत हेतूने ही याचिका दाखल करण्यात आल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
वर्धा जिल्ह्यातील सुरेश रंगारी या याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. फडणवीस यांच्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत दाखल तक्रारीची माहिती त्यांनी निवडणूक शपथपत्रात दडवल्याचा आरोप रंगारी यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जानेवारी महिन्यात सावंगी मेघे पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत आपण तक्रार दाखल केली होती, मात्र ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात फडणवीस यांनी ही माहिती दडवली, असे त्यांचे म्हणणे होते. यासंदर्भात १० ऑक्टोबर रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दिली होती. मात्र, त्या तक्रारीवर कारवाई झाली नाही, असाही सुरेश रंगारी यांचा आक्षेप होता.
न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाल्यावर न्यायालयाने याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला २ लाखांचा दंड ठोठावला. हा दंड याचिकाकर्त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे जमा करायचा आहे. दंड जमा न झाल्यास गैरजामीन वॉरंट काढण्याचा इशारा न्यायालयाने हा निर्णय देताना दिला.
रंगारी यांनी याचिकेच्या माध्यमातून लावलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळून आलेले नाही. एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करण्याच्या वाईट हेतूने ही याचिका दाखल करण्यात आली, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.