Cyclone Tauktae: देवेंद्र फडणवीसजी काय राव तुम्ही…; चित्रा वाघ यांनी ठाकरेंना लगावला टोला

Cyclone Tauktae: देवेंद्र फडणवीसजी काय राव तुम्ही...; चित्रा वाघ यांनी ठाकरेंना लगावला टोला

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याचपार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. यानंतर आता मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.

चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसजी काय राव तुम्ही…थेट दुष्काळी भागात लोकांच्या मदतीला पोहोचता…मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना.. ३ तासाच्या कोकणदौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या किती सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका..आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलं आहे, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ भीषण होते. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. जे काही नुकसान झाले आहे, केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य हवं ते केलं जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच आम्ही केंद्रानेही अधिकाधिक मदत करावी म्हणून विनंती करीत आहोत. पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत करावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.