नागपूर : चक्रीवादळ ‘फनी’चे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले असून शुक्रवारपर्यंत ओडिशामधील पुरी आणि केंद्रपाडादरम्यानच्या किनारपट्टीला ते धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय हवामान विभागाने मात्र चक्रीवादळाचे निश्चित स्थान अद्याप सांगितलेले नाही.
हवामान विभागाकडून चक्रीवादळाचे निश्चित स्थान सांगण्यात आले नसले, तरी मंगळवारी दुपारी हवामान विभागाच्या इशारा देणाऱ्या विभागाने ‘फनी’बाबत माहिती दिली आहे. ‘फनी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि नैऋत्येच्या दरम्यान आहे. पुरीपासून ८३० किलोमीटर दक्षिणेकडे, विशाखापट्टणमपासून दक्षिण-आग्नेयेकडे ६७० किलोमीटर आणि त्रिंकोमलीपासून (श्रीलंका) ईशान्येकडे ६८० किलोमीटर अंतरावर असल्याचे विभागाने म्हटले आहे. या संदर्भात स्पेशल रीलीफ कमिशनर (एसआरसी) बी. पी. सेठी म्हणाले, ‘हवामान विभागाच्या अंदाजानुसार ‘फनी’ चक्रीवादळ पुरी जिल्ह्याच्या सातपाडा किंवा चंद्रभागादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा धडकण्याची शक्यता आहे.’
अमेरिकी नौदलाने जारी केलेल्या अंदाजानुसार, ओडिशा किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकण्याचे निश्चित स्थान बुधवारी स्पष्ट होईल. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल राज्यांच्या राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीमध्ये १०८६ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जमा केली आहे. यातील ओडिशाला ३४०.८७ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील मचिलिपटनमपासून ७६० किलोमीटर अंतरावर असल्याचे विधान प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एच. आर. विश्वास यांनी सांगितले. गेल्या वर्षी ‘तितली’ वादळापेक्षा ‘फनी’चा तडाखा अधिक तीव्रतेचा असेल, असे विश्वास यांनी सांगितले.
अधिक वाचा : भारतात ‘बुरखा’, ‘नकाब’वर बंदी घाला : उद्धव ठाकरे यांची मागणी