अवनी वाघिणीच्या बछडय़ांकडून घोड्यांची शिकार

tiger in नागपूर

नागपूर : पांढरकवडय़ातील अवनी (टी-१) वाघिणीच्या बछडय़ांची शोधमोहीम सुरू असतानाच आज, सोमवारी या बछडय़ांनी घोडय़ाची शिकार केल्याची बाब उघडकीस आली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेला दुजोरा मिळाला आहे.

वाघिणीच्या मृत्यूनंतर बछडय़ांचे काय हा प्रश्न सर्वानाच होता. एक वर्षांचे देखील नसलेले हे बछडे जगतील की मरतील, असाच प्रश्न होता. २९ ऑक्टोबरला वाघिणीने शिकार केली होती आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसात तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे या शिकारीवरच बछडे होते. एक वर्षांचे देखील नसलेले बछडे शिकार करू शकतील, असे कुणालाही वाटले नव्हते.

वाघिणीच्या मृत्यूनंतर दोन वेळा बछडय़ांचा ठावठिकाणा मिळाला. त्यात टी-२ या वाघाच्या सोबतीने बछडे जगत असल्याचे स्पष्ट झाले. आज, सोमवारी वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ६५५ मध्ये घोडे बांधून ठेवलेले होते. त्यांची शिकार या बछडय़ांनी केली. याठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या घटनेचे अस्पष्ट छायाचित्र कैद झाले आहे.

टी-२ हा वाघ घटनास्थळापासून सात-आठ किलोमीटर लांब असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ही शिकार बछडय़ांनीच केली, यावर शिक्कामोर्तब झाले. वनखात्यासाठी ही घटना सकारात्मक असून वाघिणीचे बछडे त्याठिकाणी स्थिरावत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांना जेरबंद करायचे की जंगलातच स्थिरावू द्यायचे, यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही.

अधिक वाचा : ‘अवनी’ला ठार करायचे नव्हते, स्वरक्षणासाठी गोळी झाडली: नवाब अजगरअली