नागपूर : धारदार शस्त्रांनी ४० पेक्षाअधिक वार करून गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी सकाळी बेस्यातील वेळाहरी भागात उघडकीस आली. जुगारअड्ड्याच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येते. या घटनेने हुडकेश्वरमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. विजय नारायण मोहोड (वय २७ ,रा. जुनी वस्ती,नरसाळा), असे मृताचे नाव आहे. अभय राऊत, दिलीप ठवकर, सूरज कार्लेवार, निखिल, काल्या, लल्ला, रेड्डी व त्याच्या साथीदारांनी विजयची हत्या केल्याची चर्चा असून, हुडकेश्वर पोलिसांनी एका चिकन सेंटरच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वरमधील धामना भागात गत काही महिन्यांपासून विजय हा जुगारअड्डा चालवित होता. काही दिवसांपूर्वी धामनाजवळीलच खरसोली गावात अभय व त्याच्या साथीदारांनी जुगार अड्डा सुरू केला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी अभयने विजयसोबत चर्चा केली होती. अभय हा आधी कळमेश्वरमध्ये जुगारअड्डा चालवित होता. त्यामुळे कळमेश्वरमध्येच जुगारअड्डा चालविण्याचे विजयने अभयला सांगितले होते. मात्र अभयने नकार दिला. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
रविवार सायंकाळी विजय मोहोड हा त्याचे मित्र चंद्रशेखर वैद्य व रुपेश बोंडे आदींसह पिपळा फाटा रोडवरील अमित सावजी भोजनालयात जेवायला गेला. यावेळी अभय व त्याचे २० ते २५ साथीदार चार कारने भोजनालयात आले. अभयने विजयला धमकाविण्याचा प्रयत्न केला. जुगारअड्डा बंद कर, असे विजय हा अभयला म्हणाला. सोबत जुगारअड्डा चालविण्याचा प्रस्ताव अभयने विजयसमोर ठेवला. विजयने तो मान्य केला. जागा दाखविण्याच्या बहाण्याने अभय हा विजयला कारमध्ये बसवून घेऊन गेला. तत्पूर्वी विजयने मित्रांना घरी जाण्यास सांगितले. उशिरारात्रीपर्यंत विजय घरी परतला नाही. त्याच्या मोबाइलवरही संपर्क न झाल्याने मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. तो आढळला नाही. यादरम्यान विजयचा चुलत भाऊ देविदास मोहोड यांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून विजयचा शोध सुरू केला.
यादरम्यान विजयची हत्या करण्यात आल्याचे वृत्त संपूर्ण शहरात पसरले होते. पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे विजयचा शोध सुरू केला. परंतु पोलिसांना विजयचा शोध घेण्यात यश मिळाले नाही. सोमवारी सकाळी विजयचे मोबाइल लोकेशन वेळाहरी भागात आढळले. पोलिसांनी शोध घेतला असता तेथे विजय याचा मृतदेह आढळला. विजयच्या पोटावर व मानेवर धारदार शस्त्रांचे ४० पेक्षा अधिक वार होते. पोलिसांनी पंचनामा करून विजयचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रवाना केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
कारागृहाबाहेर येताच अभय सक्रिय
ऑक्टोबर २०१८ मध्ये अभय राऊत व त्याच्या साथीदारांनी पलाश दिवटे याची हत्या केली. या हत्याकांडाच्या तीन महिन्यांनंतरच अभय हा कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर पुन्हा तो गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला होता. हुडकेश्वर भागात विजयचा दबदबा वाढत होता. त्यामुळे अभयने विजयचा काटा काढल्याचीही चर्चा आहे.
अधिक वाचा : नागपूर : पोलिसनगरात ऑटोस्टॅण्ड चालकाची हत्या