Cricket World Cup : टीम इंडियाची वर्ल्डकप मोहीम आजपासून

नागपूर : कोट्यवधी पाठिराख्यांच्या अपेक्षा घेऊन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संघसहकाऱ्यांसह आज, बुधवारी आपल्या वनडे वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मागील कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा इतिहास या सगळ्या गोष्टी मागे टाकून भारतीय संघ विजयी श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्थात, दोन सामने गमावल्याने सडतोड प्रत्युत्तर देण्याचा दक्षिण आफ्रिकेकडूनही जोरदार प्रयत्न होईल, यात शंका नाही. त्यामुळे एक चुरशीची लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

सध्या तरी कागदावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा वरचढ दिसतो आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली होती. भारताचा डाव १७९ धावांत आटोपला होता. दुसऱ्या सराव सामन्यात मात्र भारताने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करून ३५९ धावांपर्यंत मजल मारली होती. यात धोनी आणि लोकेश राहुलने शतके ठोकली होती.

२०१७मध्ये येथे पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवाने आम्हाला धडे दिले आहेत. त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यावेळच्या तुलनेत आता आमची ताकद दुणावली आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.

अष्टपैलूवर खल

भारताचे पहिले सहा क्रमांक निश्चित आहेत. रोहित, धवन, विराट कोहली, राहुल, धोनी, हार्दिक पंड्या असा क्रमांक ठरला आहे. आता सातवे स्थान एका अष्टपैलूला द्यायचे आहे. त्यासाठी केदार जाधव, रवींद्र जाडेजा आणि विजय शंकर यांच्यात स्पर्धा असेल. केदार जाधव खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे. दोन्ही सराव सामन्यांत तो खेळू शकला नव्हता. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना केदार जाधव सरस ठरतो आणि त्याची फिरकीही प्रभावी ठरते. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात जाडेजाने झुंजार अर्धशतक ठोकले असून, एक विकेटही घेतली होती. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात विजय शंकर अपयशी ठरला होता. तेव्हा लढतीपूर्वीची परिस्थितीनुसार या तिघांपैकी एकाची निवड केली जाईल.

भुवीला संधी ?

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे स्थान निश्चित आहे. तिसरा तेज गोलंदाज खेळवायचा की दोन प्रमुख फिरकी गोलंदाज घेऊन खेळायचे, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. ढगाळ वातावरण असेल, तर भुवी प्रभावी ठरतो. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची कला त्याला अवगत आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि यझुवेंद्र चहल यांनी मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या प्रभावी फिरकीने जेरीस आणले होते. या सर्व गोष्टींचा निवड करताना संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे.

द. आफ्रिकेवर दडपण

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात मनासारखी झालेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही लढती नाणेफेक जिंकूनही त्यांनी गमावल्या आहेत. पहिल्या लढतीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी पराभूत केले. नंतर बांगलादेशने आफ्रिकेला धक्का दिला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली आणि आफ्रिकेला ८ बाद ३०९ धावांत रोखले. सलग दोन पराभवांमुळे आफ्रिकेवरील दडपण वाढले आहे.

स्टेन वर्ल्डकप बाहेर

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमला दुखापतीतून सावरत आहे, तर वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी मांडिचा स्नायू दुखावल्यामुळे भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याची जागा डेल स्टेन भरून काढेल, असे वाटत होते. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे स्टेन या संपूर्ण वर्ल्डकपलाच मुकणार आहे. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज हेंड्रिक्सला संघात स्थान मिळाले आहे. ३५ वर्षीय स्टेनची दुखापत बघता, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचीही शक्यता आहे. यामुळे रबाडावरील जबाबदारी वाढली आहे.

भारत वि. द. आफ्रिका

सामन्याची वेळ : दुपारी तीनपासून

आमनेसामने

वनडे- ८३

भारताचे विजय- ३४

दक्षिण आफ्रिकेचे- ४६

अनिकाली – ३

वर्ल्डकपमध्ये आमनेसामने

वनडे- ४

द. आफ्रिकेचे विजय- ३

भारताचा विजय- १

वनडे रँकिंग

भारतः २

दक्षिण आफ्रिकाः ३

अधिक पढिये : नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० प्रशिक्षणार्थ्यांची बोगस भरती